मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी मराठी विरूध्द गुजराती वाद पाहायला मिळतो आहे. उत्तर पूर्व मुंबईमधील घाटकोपर पश्चिम परिसर येथे एका गुजराती सोसायटीमध्ये शिवसैनिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. या भागातील समर्पण सोसायटीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. परंतू त्यांना या सोसायटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या सोसायटीमध्ये गुजराती लोकांची संख्या जास्त आहे.
तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या अधिक आहे. मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रचारापासून रोखले जात असल्याचा आरोप स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व मुंबई हा मतदारसंघातील गुजराती मतदार हे भाजपची हक्काचे मतदार आहे.