धनाजी नाना महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेत आधुनिक शिक्षणतंत्रावर मार्गदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम उषा) प्रायोजित ‘कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स’ ही दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यशाळेचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय सुरवाडे (संगणक प्रशाळा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे, तसेच कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रवी केसुर यांची उपस्थिती होती.

दुसऱ्या दिवसाचे विविध सत्रे प्रभावी ठरले
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर सखोल माहिती दिली. यात संशोधनाचे महत्त्व आणि प्रभावी रिसर्च पेपर लेखन – प्रा. डॉ. सागर शिंदे (विभाग प्रमुख, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे), शिक्षण आणि संशोधनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा प्रभावी वापर – प्रा. डॉ. सागर शिंदे, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि त्याचे प्रात्यक्षिक – प्रा. किरण जाधव (नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे), ई-कंटेंट डेव्हलपमेंटचे महत्त्व आणि संधी – प्रा. डॉ. अजय सुरवाडे (संगणक प्रशाळा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) या विषयांवर सादरीकरणे करण्यात आली. उपस्थित प्राध्यापक-प्राध्यापिकांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि अध्यापन कौशल्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले. समारोप समारंभात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे आणि विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण
या कार्यशाळेत महाविद्यालयातील तसेच पंचक्रोशीतील इतर महाविद्यालयांमधील अनेक प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजनातील योगदान
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, समन्वयक प्रा. डॉ. रवी केसुर, प्रा. डॉ. ताराचंद सावसाकडे यांचे मोलाचे योगदान लाभले.

Protected Content