मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुतीत पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून वाद उफाळला असून यामुळे नाशिक व रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला स्थगिती दिल्याने आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगडसाठी हा निर्णय का घेतला गेला यावर अजूनही स्पष्टता नाही, मात्र यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर एका दिवसातच हा निर्णय बदलण्यात आला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, या निर्णयालाही स्थगिती देण्यात आल्याने गिरीश महाजन यांनाही अप्रत्यक्ष धक्का बसला आहे. पालकमंत्रीपदांच्या नियुक्तीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव वाढल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारकडून या निर्णयासाठी अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उफाळल्याचे संकेत मिळत आहेत. रायगड आणि नाशिक हे दोन महत्त्वाचे जिल्हे असल्याने यावरील पालकमंत्रीपदाची निवड महत्त्वाची मानली जाते. यावर पुढील आदेश येईपर्यंत निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे.
महायुतीतील अंतर्गत वाद आता उघड होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतभेदामुळे महत्त्वाच्या नियुक्तींसाठी गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना झालेला धक्का महायुतीच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. तर या दोन्ही ठिकाणी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून उडालेला वाद महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. पुढील काही दिवसांत राज्य सरकारकडून या प्रकरणावर तोडगा निघेल अशी शक्यता आहे. मात्र, या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांना वाचा फुटली असून राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत राहणार हे निश्चित.