रावेरमध्ये जीएसटी चोरीचा सुळसुळाट 


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर शहरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) संबंधित गैरप्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील अनेक व्यापारी ग्राहकांना बिनबिलाने वस्तू विक्री करत असून त्यामुळे राज्य शासनाच्या महसुलावर मोठा गदा येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जीएसटी विभागाकडे कठोर तपासणी करण्याची जोरदार मागणी केली आहे.

शहरातील काही नामांकित व्यापारी व दुकानदार जीएसटी भरणा टाळत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. विशेषतः बिनबिलाच्या व्यवहारांमुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा नागरिकांचा ठाम आरोप आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जीएसटी विभागाने अचानक धाड टाकून एका व्यापाऱ्यावर मोठी कारवाई केली होती. मात्र त्यानंतर सुमारे तीन वर्षांपासून कोणतीही ठोस तपासणी झालेली नाही.

या त्रुटीमुळे ‘इनपुट’ आणि ‘आउटपुट’मधील फरक कसा आहे, किती माल दाखवून ठेवला जातो आणि प्रत्यक्षात किती विक्री होते, याचा ठोस तपशील उपलब्ध नाही. याशिवाय ग्राहकांना खरेदीवेळी बिल दिले जात नाही, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. हे प्रकार जीएसटी चोरीला पोषक असून, काही व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बिनबिलाने व्यवहार करून महसुलाचे मोठे नुकसान केले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर, रावेरमधील सुजाण आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत जीएसटी विभागाला निवेदन देवून शहरातील काही निवडक दुकानांवर आणि व्यावसायिकांवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तपासणी झाली, तर शासनाच्या उत्पन्नातून किती रक्कम बुडवली गेली आहे, हे सहज उघड होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे जीएसटी विभागाने तात्काळ याची गंभीर दखल घ्यावी, आणि बिनबिलाच्या व्यवहारांवर अंकुश ठेवत, कर बुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. करपद्धतीत पारदर्शकता ठेवण्यासाठी आणि शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या प्रकारावर तातडीने लक्ष दिले जावे, ही वेळेची गरज आहे.