पंढरपूरातील वारकरी दिंडीचं उत्साही स्वागत; विजयकुमार पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी होत असून, वारकरी संप्रदायाच्या विविध दिंड्या पंढरपूरात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईहून आलेल्या वारकरी दिंडीचं श्री संत तुकाराम महाराज मठ, गोपाळपूर येथे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. यावेळी दिंडीतील भाविकांना महाप्रसाद वाटप करून त्यांची सेवा करण्यात आली.

दि. २५ रोजी मुंबई येथील ३०० वारकऱ्यांची दिंडी श्री संत तुकाराम महाराज मठात दाखल झाली. यावेळी मठाचे अध्यक्ष व किनगाव येथील इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व त्यांच्या पत्नी सौ. शैलजाताई पाटील यांनी या दिंडीचे औपचारिक स्वागत केले. त्यांनी सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद वाटप करून त्यांचं मनोभावे आदरातिथ्य केलं.

याच दिवशी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, त्यांचे बंधू, तसेच डांग सौंदाणे महाविद्यालय नाशिकचे प्राचार्य डॉ. मुरलीधर हिरे हेही पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांनीही मठात निवास करून भोजनाचा लाभ घेतला. दरम्यान, धरणगाव येथील ह.भ.प. भगवान बाबा महाराज, आडगाव (ता. एरंडोल) येथील ह.भ.प. भानुदास महाराज आणि खेडी भोकरी येथील ह.भ.प. बाळू महाराज यांच्या नेतृत्वाखालील तीन वेगळ्या दिंड्यांतील एकूण २००० भाविकांच्या भोजन व निवासाची भव्य सोय मठात करण्यात आली होती.

या पवित्र कार्यात गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी सरपंच, सदस्य, कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच पोलीस पाटील यांचीही सक्रिय उपस्थिती होती. विशेषतः जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष आणि गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखा अशोक पाटील हे दोघंही मठात भाविकांची सेवा अत्यंत निस्वार्थ भावनेने करत आहेत.

श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत विजयकुमार देवचंद पाटील यांनी वारकरी संप्रदायातील हजारो भाविकांच्या सेवेसाठी उचललेला पुढाकार उल्लेखनीय असून, उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून कौतुक करत आभार मानले.