पहूर पोलीसांनी घडवले माणुसकीचे दर्शन !

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील शिवनगर भागात राहणार्‍या इसमास पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या आई – वाडिलांचा शोध लागलेला असून पहूर पोलीसांनी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून चिमुकल्याच्या पालकांचा शोध घेत माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

पहूर येथे शिवनगर वस्तीत राहणार्‍या एका इसमाकडे त्याला आढळलेले लहान मूल असल्याच्या माहीती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी चौकशी करून मुल ताब्यात घेतले. संबधीत इसमास हे मूल पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस असल्याचे आढळून आल्याने त्याने आपल्या घरी आणले असल्याचे चौकशीत आढळून आले. दरम्यान, संबंधीत मुलाचा फोटो आणि संपर्क क्रमांक फेसबुक आणि व्हाटसअ‍ॅपवर वर व्हायरल झाल्यामुळे अवघ्या दोन तासात बालकाच्या आईचा शोध घेणे शक्य झाले. परदेशी यांनी मुंबई विभाग पोलीस गृप वर सदर संदेश पाठविताच वाशी येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळीवाल यांनी पहूर पोलीसांशी संपर्क केला. या फोटोतील मुलगा आपलाच असून तो पहूर पोलीसांकडे सुरक्षीत असल्याचे समजताच त्या मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे मूल ताब्यात घेण्यासाठी आज त्याचे पालक मुंबईहून पहूरला येत आहेत. मतदानाच्या कामांमुळे वाढलेल्या ताण -तणावातूनही पहूर पोलीसांनी घडविलेल्या माणुसकिच्या दर्शनाने सर्वत्र कौतूक होत आहे.

Protected Content