शहरातील ७०० विद्यार्थ्यांना दिले विविध प्रशिक्षण
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लेवा भातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे, लेवा भातृमंडळ, वारजे आणी ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात “संयम” हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. अशा सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालयामध्ये लेवा भातृ मंडळातर्फे ‘सेल्फ अवेअरनेस इन युथ फॉर अँटी अँडीक्शन् मोटीव्ह्’ अर्थात “संयम” हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना नऊ दिवस प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये पूर्व चाचणी, पंचकोश विकसन, सौंदर्य, आरोग्य, व्यक्तिमत्व जडणघडण व नियमन, लैंगिक वर्तन, प्रसारमाध्यमांची माहिती, व्यसनाधीनता, उद्दिष्ट निश्चिती व ताणतणाव यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन, उत्तर चाचणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते.
हे मार्गदर्शन प्रशिक्षिका शुभांगी चौधरी, नीता वराडे, डॉ. ज्योती महाजन, सीमा गाजरे, संगीता पाटील, नीलिमा राणे, नीला चौधरी यांनी ७०० विद्यार्थिनींना दिले होते. यांनी निस्वार्थी व निशुल्क सेवेबद्दल सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञता सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या धांडे सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील, लेवा भातृ मंडळ, वारजेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, शानभाग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील, भादली विद्यालयाचे प्राचार्य अरविंद नारखेडे, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. जी. बावणे उपस्थित होते.
यावेळी सहभागी विद्यालय आणि प्रशिक्षकांनी प्रशिक्षण शिबिरात त्यांना आलेले अनुभव कथन केलेत. तसेच या ‘संयम’ प्रशिक्षण उपक्रमाची शृंखला इतर विद्यालयांमध्ये देखील पुढे राबविण्याचा मानस प्रशिक्षकांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षकांच्या कार्याबद्दल कौतुक करून विद्यार्थिनींना योग्य वयात जनजागृती केल्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल जावळे यांनी केले.