Home Cities अमळनेर अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्याचे भव्य सादरीकरण 

अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्याचे भव्य सादरीकरण 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे सादरीकरण मोठ्या उत्साहात झाले. संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महानाट्याचे दोन्ही प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले.

जयनिल फाऊंडेशनच्या वतीने सकाळी १० वाजता महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी स्वतंत्र प्रयोग आयोजित करण्यात आला. या वेळी प. पु. संत प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते फाऊंडेशनचे लोगो अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ आणि माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील, कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, जितेंद्र ठाकूर आणि जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील उपस्थित होते. या वेळी प्रसाद महाराजांनी आशिर्वचन दिले, तर आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.

जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी राजे हे तरुणाईचे आदर्श आहेत. म्हणून खास युवकांसाठी हा प्रयोग ठेवला आहे. याच दिवशी फाऊंडेशनचा शुभारंभ देखील करण्यात आला असून, भविष्यात शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करून तरुणाईला केंद्रबिंदू मानून काम केले जाईल.” संस्कृती फाऊंडेशनचे निकेश राजपुत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार अनिल पाटील आणि जयनिल फाऊंडेशनचे आभार मानले.

या महानाट्यात सुमारे २५० कलाकारांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे यातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक कलाकार अमळनेरचे होते. “ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनने केला,” असे सांगितले जाते. कथानक सुंदर असून अनेक क्षण अंगावर शहारे आणणारे होते. संभाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणांनी प्रेक्षकांचे डोळे पाणावले. शेवटी संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलावंतांसमोर अनेक प्रेक्षक नतमस्तक झाले आणि संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे आभार मानत मार्गस्थ झाले.


Protected Content

Play sound