राज्यपाल आज राजभवनात दाखल होणार : घडामोडींना येणार वेग

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात राजकीय नाट्य सुरू झाल्यानंतर कोरोनाची लागण झालेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज कोरोनामुक्त झाल्याने राजभवनात दाखल होण्याची शक्यता असून यानंतर वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

२० जूनच्या रात्रीपासून एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन सुरतकडे निघाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर त्यांच्या समर्थकांचा आकडा वाढत जाऊन तो तब्बल ५० वर पोहचला आहे. यात शिवसेनेचे ४१ तर अपक्ष ९ आमदारांचा समावेश असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र २१ जूनच्या सकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आता राज्यपाल कोश्यारी हे कोरोनामुक्त झाले असून आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेष करून शिंदे गटातर्फे त्यांना अधिकृत पत्राच्या माध्यमातून नवीन गट स्थापनेबाबतची माहिती दिली जाऊ शकते. आधी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाला दणका दिल्याचे काम केले आहे. यानंतर आता राज्यपालांच्या हातात मोठे अधिकार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content