खडसेंना डोक्यावर घेऊन फडणवीसांना टार्गेट करण्याचे काम सरकार करतेय- लाड

मुंबई प्रतिनिधी । स्वत:च्या मुलीस देखील निवडून आणू न शकलेल्या एकनाथ खडसे यांची ताकद फारशी नसून त्यांना डोक्यावर घेऊन फडणविसांना टार्गेट करण्याचे काम राज्य सरकार करत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाणार आहेत, या दौर्‍याच्या निमित्ताने एकनाथ खडसे शक्तीप्रदर्शन करतील असं सांगण्यात येत आहे. या दौर्‍यात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील आहे. या प्रकारावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही, त्यामुळे खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

प्रसाद लाड पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंची तडफड सुरु आहे. पण त्यांनीही काहीही केलं तरी भाजपा कमजोर नाही, आम्ही सक्षम आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असा आरोप त्यांनी केला आहे.

आमदार प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे आता खडसे यांना उत्तर देण्याचे काम त्यांचे सहकारी करत असल्याचे यातून दिसून आले आहे.

Protected Content