मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगातील दोन दिग्गज टेक कंपन्या गुगल आणि सॅमसंग यांनी ग्राहकांसाठी अनेक नावीन्यपूर्ण डिव्हाईसेस बाजारात आणली आहेत. यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, ईअरबड्स यांचा समावेश आहे. आता या कंपन्या एकत्र येत ग्राहकांसाठी एक अनोखे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेले ‘अँड्रॉइड एक्सआर स्मार्ट ग्लासेस’ लाँच करणार आहेत. हा नवीन स्मार्ट डिव्हाईस कोणताही फोन, घड्याळ किंवा हेडफोन नसून एक स्मार्ट ग्लास आहे, जो वापरकर्त्याचा डिजिटल अनुभव पूर्णपणे बदलून टाकणार आहे.
2026 पर्यंत हे अनोखे एक्सआर ग्लासेस लाँच करण्यात येतील, असा दावा अलीकडील अहवालांमध्ये करण्यात आला आहे. कोरियन इकॉनॉमिक डेलीच्या रिपोर्टनुसार, गुगल या प्रोजेक्टमध्ये सॉफ्टवेअर आणि प्रणाली भाग सांभाळणार आहे, तर सॅमसंग हार्डवेअर डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगचा भार उचलणार आहे. गुगलने या प्रकल्पासाठी एक प्रोटोटाइपही तयार केला असून त्याची पहिली झलक टेड 2025 परिषदेत सादर करण्यात आली होती.
1. लाईव्ह ट्रान्सलेशन :या ग्लासेसमध्ये तुम्हाला रिअल-टाइम ट्रान्सलेशन पाहायला मिळेल. म्हणजे समोरचा व्यक्ती वेगळ्या भाषेत बोलत असला तरी त्याचे भाषांतर तुमच्या ग्लासेसवर दिसणार आहे – अगदी सहज आणि झटपट!
2. मेमरी रिकॉल : जर तुम्ही काही पाहिले असेल आणि विसरलात, तर या ग्लासेसमधील मेमरी रिकॉल फीचर त्या दृश्यांची आठवण करून देईल. हे वैशिष्ट्य विसरणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
3. प्रगत नेव्हिगेशन : ग्लासेस घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोरच नेव्हिगेशन दिसेल. म्हणजे मोबाइलमधील नकाशा बघण्याची गरज नाही – तुमचे ग्लासच मार्गदर्शक बनतील. यामुळे आयर्न मॅनचा सूट आठवावा, असे अनुभव मिळू शकतो.
पूर्वी सांगितलं जात होतं की हे स्मार्ट ग्लासेस 2025 च्या अखेरीस लाँच होतील. मात्र, नवीन माहितीनुसार 2026 मध्ये यांचे फुल स्केल लाँचिंग अपेक्षित आहे. याच्या उत्पादन व प्रमोशनमध्ये सॅमसंग मोठी भूमिका बजावणार आहे. गुगल आणि सॅमसंगचा हा क्रांतिकारी प्रकल्प XR (Extended Reality) तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. भविष्यातील डिजिटल जगात अशा स्मार्ट ग्लासेसमुळे आपल्या जीवनशैलीत मोठे बदल घडतील, याबाबत शंका नाही.