मुंबई-वृत्तसेवा । तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात हेडफोन्सची भूमिका आता केवळ संगीत ऐकण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सेन्सर्स आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने हे उपकरण आता वैयक्तिक सहाय्यक (पर्सनल असिस्टंट) म्हणून विकसित होत आहेत. वापरकर्त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचे विश्लेषण करणे, संवाद समजून घेणे, आरोग्याशी संबंधित संकेत ओळखणे आणि त्वरित निर्णय घेणे—अशा अनेक स्मार्ट क्षमतांनी एआय हेडफोन्स सुसज्ज झाले आहेत.
पूर्वी हेडफोनचे मुख्य कार्य फक्त आवाज ऐकवणे इतकेच होते. मात्र आता अॅडॉप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, व्हॉइस कमांड, लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन, हार्ट रेट व बॉडी टेम्परेचर ट्रॅकिंग, तसेच लोकेशन व अॅक्टिव्हिटी मॉनिटरिंग यांसारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी हेडफोन्स अधिक ‘स्मार्ट’ बनले आहेत.

एआय हेडफोन्सची कार्यपद्धती देखील अत्यंत प्रगत आहे. यात असलेले मायक्रोफोन, सेन्सर आणि एआय सिस्टिम वापरकर्त्याच्या आसपासचे वातावरण सतत स्कॅन करतात. आपण कोणाशी बोलत आहोत, किती आवाज आहे, आपण कुठे आहोत यासारखी माहिती ते समजून घेतात. हा डेटा त्वरित प्रोसेस करून एआय स्वतःच निर्णय घेतो—उदा. आवाज कमी-जास्त करणे, बॅकग्राउंड नॉइज हटवणे इत्यादी.
या क्षेत्रात प्रमुख टेक कंपन्यांची स्पर्धा वाढली आहे. Apple चे AirPods Pro हे ट्रान्सपरन्सी आणि नॉइज आपोआप संतुलित करत असून, वापरकर्ता बोलू लागल्यास संगीत आपोआप मंद होते. Google चे Pixel Buds Pro 2 ४० भाषांमध्ये थेट भाषांतराची सुविधा देतात. JBL चे Live Beam 3 फिटनेसकडे लक्ष केंद्रित करत ६ मायक्रोफोनसह बाहेरील आवाज ऐकण्याची सोय देतात. Samsung चे Galaxy Buds 3 Pro महत्त्वाचे सायरन किंवा ट्रॅफिकचे आवाज ओळखून वापरकर्त्यापर्यंत पोहोचवतात, तर Beats चे Powerbeats Pro 2 PPG सेन्सरद्वारे हृदयाचे ठोके अचूकपणे मोजतात.
एआय हेडफोन्सच्या चार प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंटेलिजेंट नॉइज मॅनेजमेंट, रिअल टाइम ट्रान्सलेशन, अॅडॅप्टिव्ह ऑडिओ वैयक्तिकरण आणि आरोग्य व उत्पादकता ट्रॅकिंग यांचा समावेश होतो. गर्दीतही समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू येणे, वेगवेगळ्या भाषांमधील संवाद सहज शक्य होणे, कानाच्या आकारानुसार साउंड प्रोफाइल बदलणे आणि मीटिंगचे ट्रान्सक्रिप्शन करून नोट्स तयार करणे—या सुविधा वापरकर्त्याचा अनुभव अधिक सुलभ करत आहेत.
एकूणच, एआय हेडफोन्स हे केवळ ऑडिओ डिव्हाइस न राहता ‘स्मार्ट साथीदार’ बनत आहेत. आगामी काळात या उपकरणांमध्ये आणखी प्रगत आरोग्य मॉनिटरिंग आणि निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता असून, तंत्रज्ञानाच्या या नव्या क्रांतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



