जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका धान्य दुकानातून रोख रकमेसह धान्याची बिले असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी ३ मे रोजी रात्री ९.३० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी ४ मे रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाणा बाजारात विकी लक्ष्मणदास वाल्याच्या (वय ३८, रा. सिंधी कॉलनी) यांचे ‘वाल्याच्या ट्रेडिंग’ नावाचे धान्य दुकान आहे. शनिवारी ३ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला आणि ९० हजार रुपयांची रोकड व धान्याची महत्त्वाची बिले चोरून नेली. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच, विकी वाल्याच्या यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रविवारी ४ मे रोजी मध्यरात्री १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.