नियमित अभ्यासाने नेहा सैतवालने गाठले यश शिखर! अकाउंट्समध्ये मिळविले ९९ गुण

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परिश्रम, नियमितता आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर सहज गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जळगावच्या नेहा विजयकुमार सैतवाल. बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेतील अकाउंट्स या प्रमुख विषयात तब्बल ९९ गुण मिळवत तिने स्वतःचे कष्ट सार्थकी लावले आहेत. तिच्या या उत्तुंग यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तिचे कौतुक होत आहे.

नेहा ही स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, सोमवारी (५ मे) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात तिने ८१.५० टक्के गुण प्राप्त केले. यामध्ये अकाउंट्स या विषयात तिने १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत, जे तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे फळ आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) या विषयात तिला ९० गुण मिळाले आहेत. तिच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयासह कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

नेहाने आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना, तसेच सतत प्रोत्साहन देणाऱ्या पालकांना दिले आहे. तिचे वडील पत्रकार विजयकुमार सैतवाल हे प्रसारमाध्यम क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व आहेत. अभ्यासात सातत्य आणि ध्येयप्रती असलेली निष्ठा यामुळे यश अवश्य मिळते, हेच नेहाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. परीक्षेच्या काळात तिने कोणताही दिवस वाया न घालवता दररोज नियमित अभ्यास केला. सोशल मीडियापासून दूर राहून, वेळेचे योग्य नियोजन करत ती अभ्यासात गर्क राहिली.

शाळा आणि शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाचा तिने योग्य उपयोग करत आपल्या अभ्यासपद्धतीत सातत्य ठेवले. आपल्या अभ्यासातून नेहा सैतवालने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. तिच्या यशामुळे तिच्या महाविद्यालयाची मानही उंचावली असून, भविष्यातही ती असेच यश संपादन करील, असा विश्वास तिच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

Protected Content