Home Cities जळगाव पानांपासून साकारले गणपतीचे कलारूप ; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली निसर्गाची जोड

पानांपासून साकारले गणपतीचे कलारूप ; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली निसर्गाची जोड

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे आत्मसात करणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव देणारा आनंददायी अनुभव असतो. याची प्रचिती मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिर येथे ‘विना दप्तराची शाळा’ या उपक्रमातून आली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या पानांचा कलात्मक वापर करून आकर्षक गणपतीच्या प्रतिकृती साकारत अभिनव कलाविष्कार घडविला.

पिंपळ, जास्वंद, अशोक यांसह विविध झाडांची पाने विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने वापरली. पानांचा आकार, रंग, रचना आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी गणपतीचे विविध कलारूप साकारले. उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीतून कलाकृती तयार करण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. या उपक्रमातून निसर्गाविषयीची आस्था निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती आणि कल्पकतेलाही चालना मिळाली. उपक्रमशील कलाशिक्षक व निसर्गप्रेमी सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर या उपक्रमाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. पानांची निवड कशी करावी, त्यांची रचना कशी करावी, उपलब्ध साहित्याचा योग्य वापर कसा करावा, तसेच पानांच्या आकारातून गणपतीचे विविध अवयव कसे साकारता येतील, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘निसर्गातून कला आणि कलेतून आनंद’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘विना दप्तराची शाळा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गाणी, गोष्टी आणि मनोरंजक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नेहमीच्या वर्गातील अभ्यासापेक्षा वेगळ्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिकण्याची, खेळण्याची आणि स्वतःच्या कलागुणांना व्यक्त करण्याची संधी मिळाली. खेळातून सहकार्याची भावना, गाण्यांतून आनंद, गोष्टींतून मूल्यशिक्षण आणि कलाकृतीतून सर्जनशीलता अशा विविध पैलूंचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून काही काळ मुक्त वातावरणात आनंदाने शिकता आले. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आणि त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगताना पुस्तकांबरोबरच निसर्ग, कला, खेळ आणि अनुभवातून शिक्षण देणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे नमूद केले.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणपतीच्या पानांवरील कलाकृतींचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडीच्या मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका अलका महाजन, मिरा चौधरी, वैशाली साळुंके आणि मनोजकुमार बावस्कर यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळालेली निसर्गाची जोड आणि कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी राबविलेला अभिनव उपक्रम याबद्दल उपस्थितांनी प्रशंसा केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव, कला आणि निसर्गाशी जोडण्याच्या या प्रयत्नामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound