


अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘श्रीगणेशा आरोग्य अभियान’ तसेच ‘तिशीचा पल्ला, तपासणी व सल्ला’ या उपक्रमांतर्गत १९ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्त नमुना चाचण्या, रक्तदाब, मधुमेह तपासणीसह गरोदर माता आणि बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक साई मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीसमोर सकाळी ११ वाजता शिबिराची सुरुवात झाली. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये बिगर संसर्गजन्य आजारांच्या (NCD) अनुषंगाने नागरिकांची विशेष तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी तसेच रक्ताच्या विविध चाचण्यांचा समावेश होता. आरोग्याशी संबंधित समस्या आढळणाऱ्या नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. ‘तिशीचा पल्ला, तपासणी व सल्ला’ या विशेष मोहिमेअंतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, आजारांचे वेळीच निदान आणि निरोगी जीवनशैली याबाबत नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. बदलती जीवनशैली आणि वाढत्या बिगर संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नियमित तपासणी करण्याचे महत्त्व या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
शिबिरात गरोदर मातांची (ANC) तसेच बालकांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक बाबींची माहिती देऊन वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे एकाच ठिकाणी कुटुंबातील विविध वयोगटातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा मिळाल्या. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ आणि ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढून देण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांना डिजिटल आरोग्य नोंदणी आणि शासकीय आरोग्य योजनांशी जोडण्यास मदत झाली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. शुभम पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य सहाय्यक वाय. आर. पाटील, आर. बी. नेरकर, अधिपरिचारिका पल्लवी साखरे, सजल शेख, आरोग्य सेवक सुभाष पिंपळशेंडे, स्थानिक आशा सेविका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. साई मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आरोग्यविषयक जनजागृती आणि प्रत्यक्ष तपासणीचा उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळाला. नियमित आरोग्य तपासणी, आजारांचे लवकर निदान आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.



