



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग,येथील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात विद्यार्थिनींसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
या मंगलमय कार्यक्रमाला डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडित, प्रमोद भिरूड, अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील तसेच उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात विधिवत धार्मिक पूजनाने करण्यात आली. पुरोहित संदीप का. वैद्य यांच्या मंत्रोच्चारात कर्मचारी गणेश नांदुरकर यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.
श्री गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने आरती व धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदविला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वसतिगृहातील वातावरण अधिकच भक्तिमय बनले.
या प्रसंगी सर्वांच्या सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल यशासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थिनींच्या जीवनात सकारात्मकता, संस्कार आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, विद्यार्थिनी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



