Home क्राईम यावल शहर-तालुक्यात २४ तासांत तिघांनी घेतला टोकाचा निर्णय

यावल शहर-तालुक्यात २४ तासांत तिघांनी घेतला टोकाचा निर्णय

0
5


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहर आणि तालुक्यात मागील २४ तासांत आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दोन तरुणांनी गळफास घेऊन, तर एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील इंदिरा गांधी हायस्कूललगतच्या डांगपुरा परिसरात शेख मुजाहिद शेख मुन्शी मोमीन (वय ३९) यांनी गळफास घेतल्याची घटना रविवारी रात्री निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत सांगवी खुर्द येथील प्रमोद श्रावण गोसावी (वय ४१) यांनी पायाच्या आजाराला कंटाळून गळफास घेतल्याची माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचीही यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

तिसरी घटना दहिगाव येथे घडली. नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील (वय ३६) हे दारूच्या व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त होते. त्यांना व्यसनमुक्तीसाठी उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर ते अचानक घरातून बेपत्ता झाले होते. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या तिन्ही घटनांमुळे यावल शहरासह तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी तिन्ही घटनांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे. प्रत्येक घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी, पोलीस हवालदार उमेश महाजन आणि पोलीस नाईक वसीम तडवी पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound