कोरपावलीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्या : सरपंचांची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पूर्णवेळ ग्रामसेवका अभावी गावातील विकास कामांसह नागरीकांची विविध दाखल्यांची कामे होत नसल्याने त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे  तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला पूर्णवेळ देणारे ग्रामसेवक द्या. अशी मागणी सरपंच यांनी केली आहे.

पंचायत समिती प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत असून सरपंच विलास अडकमोल यांनी आज प्रभारी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन याविषयी आपल्या व्यथा मांडल्यात.

या संदर्भात सरपंच विलास अडकमोल यांनी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांची भेट घेऊन तक्रार निवेदन दिले आहे. यात, यावल तालुक्यातील कोरपावली हे ग्राम पंचायतीचे मोठया लोकसंख्येचे गाव हे असून या गावात अनु. जाती, अनुसुचित जमाती व इतर मागसवर्गीय व इतर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहातात. त्यांना शासकीय, शैक्षणिक आणि शेती कामांसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना पुर्णवेळ ग्रामसेवक नसल्या कारणाने वारंवार ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागतात. शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांना शासकीय योजनांपासून वंचीत राहावे लागत आहे.

शेतकरी बांधवांना देखील विविध योजनांच्या लाभापासून दाखल्या अभावी वंचित राहावे लागत आहे. तरी पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ वरिष्ठ पातळीवर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती वरील ग्रामसेवकांची समस्या मांडून तात्काळ कायमस्वरूप पूर्णवेळ देणाऱ्या ग्रामसेवकांची नेमणुक करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सरपंच विलास नारायण अडकमोल , उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार समशेर तडवी, भारती अमोल नेहते, आरीफ कलंदर तडवी , दिपक चुडामण नेहते, हुरमत सिकंदर तडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content