गिरीशभाऊ…थोडं आपल्या मतदार संघाकडेही लक्ष द्या !

mahajan girish jamner taluka

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्वाधिक कुपोषित बालकं हे जामनेर तालुक्यात, सर्वाधिक पाणी टॅकरही जामनेर तालुक्यातच सुरु आहेत. शेतकरी आत्महत्या,बेरोजगारीचा मुद्दा देखील जामनेरातील मोठी समस्याच आहे. तशात आज ढालगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मागील १७ दिवसापासून शिक्षक नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवित अनोख्या पद्धतीने निषेध केला. एकंदरीत जामनेरमधील विविध समस्या लक्षात घेता, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आपल्याच मतदार संघाकडे लक्ष आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय.

 

भाजपचे संकटमोचक पण स्वतःचा मतदार संघ संकटात

 

लोकसभेच्या निवडणुकीपासून गिरीश महाजन यांचे राज्यातील राजकारणात जरा जास्तीचे लक्ष आहे. तशात लोकसभेतील विजयाचे बक्षिसी म्हणून त्यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील देण्यात आले आहे. राज्यातील कुठल्याही राजकीय घडामोडीवर गिरीशभाऊ लक्ष ठेऊन असतात. विशेष करून दुसऱ्या पक्षातील अस्वस्थ नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची विशेष जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. थोडक्यात राज्यातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेऊन असणाऱ्या गिरीशभाऊंचे आपल्याच मतदार संघाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

 

आज पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मागील १७ दिवसापासून शिक्षक नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवित अनोख्या पद्धतीने निषेध केला. विशेष म्हणजे गिरीशभाऊंकडे जळगावचे पालकमंत्रीपद आजच्या घडीला उच्च वैद्यकीय शिक्षण खाते. एवढेच काय तर, जी.प. अध्यक्ष,शिक्षण सभापती देखील त्यांच्याच गोटातील आहेत. त्यामुळे जर जामनेर मतदार संघातील साध्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक उपलब्ध होत नसेल. तर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची काय स्थिती असेल? याची लोकं तुलना करतात.

 

शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय

 

जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा आणि खडकी या गावातील सुभाष चव्हाण आणि केसरीमल नाईक या दोन शेतकऱ्यांनी २०१४ मध्ये आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. हा विषय अगदी राज्यभर गाजला होता. जामनेर तालुक्यात २०१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१५-१६ मध्ये २१ तर जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. जानेवारी ते जून २०१९ अखेर जामनेर तालुक्यात ५ तर जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचाच अर्थ २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून मंत्रीपद सांभाळणारे गिरीशभाऊंच्या मतदार संघात आतापर्यंत शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत, हे स्पष्ट आहे. अगदी प्रती महिना किमान १ शेतकरी आत्महत्या करतोय. मागील सहा महिन्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री पद मिरवून घेत असतांना गिरीश महाजन यांना या गंभीर गोष्टीकडे कोणत्याही सबबीखाली दुर्लक्ष करताच येणार नाही. कापसावर बोड अळीचा प्रादुर्भाव झाला तेव्हा शासनाकडून त्याची भरपाई काही हजारांत करण्यात आली होती. परंतु अनेक शेतकर्‍यांना ते अनुदान अद्याप मिळालेले नाही, ही वस्तूस्थिती देखील ना. महाजन यांना लक्षात घ्यावी लागेल.

 

कुपोषणातही जामनेर जिल्ह्यात पहिला

 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आजच्या घडीला उच्च वैद्यकीय शिक्षण खाते आहे. एवढेच नव्हे तर, राज्यभरात वैद्यकीय कॅम्प घेऊन त्यांनी आपली ओळख आरोग्य दूत म्हणून निर्माण केली आहे. परंतू जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक कुपोषित बालकं हे ना. महाजन यांच्याच विधासभा मतदार संघात असल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारी सांगतेय.

जिल्ह्यात आजही अतितिव्र कमी वजनाची ३ हजार ७४५ मुलांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्वसाधारण वजन असलेल्या श्रेणीतील २ लाख ५ हजार ९९२ मुलांची तर कमी वजनाची २६ हजार ७९५ मुलांची नोंद करण्यात आली. तीव्र कुपोषित ३२ , मध्यम कुपोषित : १४० अशी सर्वाधिक कुपोषित बालके जामनेर विभागात आहेत.

 

जलसंपदा मंत्री असून मतदार संघात पाणीबाणी

 

गिरीश महाजन यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यापासून त्यांच्याकडे राज्याचे जलसंपदा खाते आहे. तरी देखील पावसाळा सुरु झाल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण समस्या उग्ररूप धारण करून आहे. विशेष म्हणजे ना.महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदार संघच सर्वाधिक जलसंकटात असल्याची धक्कादायक माहिती मागील महिन्याच्या शासकीय आकडेवारीतून समोर आली होती. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांचा मतदार संघच तहानलेला असेल तर, राज्याची स्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थितीत होणे,स्वाभाविक आहे. जून महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या आकडेवारी नुसार जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी बारा तालुक्यांतील २४७ गावांत २१८ टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. त्यानुसार जामनेर तालुक्यातील ४२ गावांमध्ये ४४ टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. विशेष म्हणजे जामनेर तालुक्यातच सर्वाधिक विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जामनेरमधील ५४ गावांपैकी ५३ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

 

निवडणूक जिंकणे म्हणजे विकास नव्हे !

विधानसभा तोंडावर आहे. आजच्या घडीला जामनेर विधानसभा मतदार संघात गिरीश महाजन यांचेच पारडे जड आहे. परंतु निवडून येणे हा विकासाचा निकष नसतो. कारण तुल्यबळ उमेदवार समोर नसणे, हे देखील अनेकांच्या विजयाचे गणित असते. सेमी मुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची राज्यात ओळख आहे. अगदी काही कार्यकर्त्यांनी तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरही लावले होते. म्हणून किमान भविष्यातील संधी बघता आपल्या मतदार संघातील समस्यांवर ना.महाजन यांना आता लक्ष द्यावेच लागेल. शेतकरी आत्महत्येप्रमाणे बेरोजगारीचा मुद्दा देखील लक्षात ठेवा कारण जामनेरमधीलच एका तरुण अभियंत्याने नौकरी नाही म्हणून आत्महत्या केली होती. किमान मताधिक्क्य वाढण्यासाठी तरी या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष घातले पाहिजे. लोकांना गृहीत धरायला लागण्यास मतदारांनी गांधी राहुल गांधीला अमेठीतून पराभूत केल्याचं उदाहरणं आतचाचं आहे. त्यामुळे गिरीशभाऊ…थोडं मतदार संघाकडेही लक्ष द्या !

Protected Content