जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी देखील दणदणीत विजय संपादन करत जिल्हा दुध संघात एंट्री मिळविली आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांनी भाजपला अंधारात ठेवून निवडणुकीत विजय मिळविला होता. यात जामनेर तालुक्यातील बहुतांश मतदार सोबत असतांनाही गिरीश महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मविआच्या नेत्यांनी व विशेष करून एकनाथ खडसे यांनी दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र हा धोका त्यांच्या वर्मी लागला होता. यानंतर त्यांनी अनेकदा ही बाब बोलून देखील दाखविली होती.
जिल्हा बँकेचा बदला घेण्यासाठी ना. गिरीश महाजन यांनी जामनेर सोसायटी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. माघारीच्या दिवशी दोघांनी अर्ज मागे घेतला मात्र सहकारतर्फे दिनेश पाटील हे रिंगणात राहिले. त्यांच्या विरोधात ना. गिरीश महाजन यांचे पारडे जड मानले जात होता. निकालातून हेच अधोरेखीत झाले.
आज सकाळी झालेल्या मतमोजणीत ना. गिरीश महाजन यांना २७६ तर दिनेश पाटील यांना १५८ इतकी मते मिळाली. यामुळे ना. गिरीश महाजन हे तब्बल १२८ मतांनी विजयी झाले. अर्थात, गिरीशभाऊंनी जिल्हा बँकेचा वचपा काढल्याचे यातून अधोरेखीत झाले.