लक्षणीय ठरलेल्या रावेरात ठकसेन पाटलांची ‘ठसन’ ! : जगदीश बढे पराभूत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदा दुध संघाच्या निवडणुकीचा मुख्य झोत हा मुक्ताईनरच्या पाठोपाठ रावेर तालुक्यात राहिला होता. या प्रतिष्ठेच्या लढतीत ठकसेन पाटील यांनी बाजी मारली आहे.

रावेर सोसायटी मतदारसंघातून यंदा विलक्षण नाट्यमय घटना घडल्या. येथून आधीचेच संचालक असणारे जगदीश बढे हे सहकार पॅनलमधून रिंगणात होते. त्यांच्या विरूध्द गीताताई चौधरी आणि मिलींद वायकोळे यांनी अर्ज दाखल केला होता. यात दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरत बढे हे बिनविरोध निवडून आल्याचे चित्र तयार करण्यात आले. मात्र इतक्यात चिनावल येथील ठकसेन पाटील यांनी या रिंगणात उडी घेतली. जिल्हा दुध संघात निवडणूक लढविण्यासाठी आपल्याला मज्जाव करण्यात आला. यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या दाव्यावरून आधी नाशिक येथील सहकार आयुक्त (दुध व सहकार) आणि नंतर न्यायालयात लढाई रंगली. यात ठकसेन पाटील यांना निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्याने येथे जगदीश बढे व त्यांच्यात लढत झाली.

निवडणुकीच्या काळात जगदीश बढे यांच्यावर शेतकरी विकास पॅनलतर्फे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यांनी एजन्सी देण्याच्या नावाखाली औरंगाबाद येथील गोपीचंद पाटील यांच्याकडून दोन लाख रूपये घेतल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. तर बढे यांनी ठिबक संचासाठी हे पैसे घेतल्याचा युक्तीवाद केला. या गदारोळामुळे रावेर तालुक्यातील लढत जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी झालेल्या मतमोजणीत ठकसेन पाटील यांना २६६ तर जगदीश बढे यांना १७० इतकी मते मिळाली. यामुळे ठकसेन भास्कर पाटील हे ९६ मतांनी विजयी झाले. अर्थात, या प्रतिष्ठेच्या लढतीत बढे यांचा पराभव होत ठकसेन पाटलांची ठसन दिसून आली.

Protected Content