अखेर ‘महाजनकी’वर शिक्कामोर्तब ! ( भाष्य )

0

girish mahajan

जळगावच्या पालकमंत्रीपदी ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील नव्या नायकावर शेवटचे आणि निर्णायक शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात, सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांच्यानंतर रिक्त असणारे जिल्ह्याचे अनभिषीक्त राजकीय नेतृत्व म्हणून आता गिरीशभाऊंना ‘अधिकृत’ स्थान मिळाले आहे.

ससा आणि कासव यांच्यातील शर्यतीची शाश्‍वत कथा राजकारणालाही लागू पडते. तथापि, राजकारणात याला थोडा वेगळा आयाम आहे. नेत्यांना काही वेळेस ससा बनावे लागते तर काही वेळेस कासव ! या दोघांचा मिलाफ ज्यांच्यात असेल तोच यशस्वी राजकारणी बनू शकतो. याच प्रकारे गती आणि सातत्याला संयमाची जोड देत ना. गिरीश महाजन यांनी राजकारणात मारलेली मुसंडी ही भल्याभल्यांना आश्‍चर्यकारक वाटणे स्वाभाविक आहे. एकीकडे भाजपसारख्या कॅडरबेस्ड पक्षात कारकिर्द करतांना आवश्यक असणारी सावधगिरी अंगी बाळगतांना दुसरीकडे जनाधार मजबूत केल्यानंतर गिरीश महाजन यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये जोरदार आगेकूच केली. याचा लाभ त्यांना झाला. २०१४ साली राज्यात सत्ता मिळाल्यानंतर जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण आदींसारखी महत्वाची खाती त्यांना मिळाली. मात्र याच वेळी एकनाथराव खडसे यांच्यासारख्या जिल्ह्यातील मातब्बर नेत्याला यापेक्षा जास्त खाती मिळाली होती. खडसेंकडेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. तर ना. महाजन यांच्याकडे नाशिकची धुरा देण्यात आली होती. कुंभमेळा यशस्वी करून त्यांनी पालकमंत्रीपदाची चांगली सुरूवात केली. दोन वर्षातच एकनाथराव खडसे यांच्यावर विविध आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. यावेळी गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याची सूत्रे मिळतील असे मानले जात होते. तथापि, खडसे आणि महाजन गटात वाद नको म्हणून समन्वयी भूमिका असणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले होते. मात्र, दोन्ही गटांमधील धुम्मस पाहून त्यांनी सातत्याने सावधगिरीची भूमिका घेतली. याचा जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आजच्या निर्णयाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याचे अनेक राजकीय अर्थ आहेत. एक तर राज्यभरात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार्‍या गिरीशभाऊंना होम पीचवर खेळण्यासाठी मिळाले नव्हते. आता त्यांना ही संधी मिळणार आहे. यातून जिल्हा विकासासाठी आवश्यक असणारे धोरणात्मक निर्णय हे जलद गतीने होऊ शकतात. येत्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या काळात अनुकुल प्रशासकीय यंत्रण राबविण्यासाठी पालकमंत्रीपद असणे आवश्यक असते. या पार्श्‍वभूमिवर, अचूक वेळ साधून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची बाबदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. खडसेंच्या राजीनाम्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपला जिल्ह्यात दणदणीत यश मिळाले. यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंदूलाल पटेल यांचा एकतर्फी विजय आणि जळगाव महापालिकेत फुललेले कमळ या बाबी ना. गिरीश महाजन यांची पकड दर्शविणार्‍या होत्या. तर आता जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागांवर मिळवलेल्या विजयाने त्यांचे राजकीय वजन अजून वाढले आहे. या कामाची पावती म्हणून त्यांना स्वत:च्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याची बाब स्पष्ट आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा गत २५ वर्षांचा इतिहास हा एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यावाचून पूर्ण होऊ शकणारा नाही. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी स्पर्धा करून जिल्ह्यातील राजकीय सूत्रे आपल्या हातात ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अत्यंत कटुतेच्या पातळीवर पोहचलेल्या या वर्चस्वाच्या लढाईत दोन्ही मान्यवरांचे खूप नुकसान झाले. तर ना. गिरीश महाजन यांनी सातत्याने बेरजेच्या राजकारणावर भर देऊन यशाच्या पायर्‍या चढण्यास प्राधान्य दिले. यामुळे आज जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नव्या नेत्याचा उदय झाल्यावर शेवटचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. खडसे व जैन यांच्यातील वितुष्टाने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आलेला गढूळपणा दुर करण्यात गिरीशभाऊ यशस्वी होणार का ? त्यांच्या पालकमंत्रीपदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी लाभ होणार का ? भाजपमधील गटबाजीला ते वेसण कसे घालणार ? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळणार आहे. तूर्तास, जिल्ह्याचे नवे पालकमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांना शुभेच्छा. त्यांच्या कारकिर्दीत तरी विकासाला वेग येवो ही अपेक्षा.

जळगाव महापालिका निकालानंतर एबीपी-माझा या वृत्तवाहिनीवरच्या विश्‍लेषणात मी भाजपचा विजय हा जिल्ह्याच्या राजकारणातील ‘पॉवर शिफ्ट’ होण्याचा कालखंड असल्याचे नमूद केले होते. आज दहा महिन्यांनी यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शेखर पाटील

संपादक Live Trends News

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!