
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याने बेघर झालेल्या फेकरी (ता. भुसावळ) येथील लाभार्थ्यांनी अखेर प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेत आज (दि. २२ जून) पासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सौ. नीता राजू सोनवणे व अन्य लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ ऑगस्ट २०२५ रोजी घरकुल मंजुरीचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करत आपली जुनी घरे पाडली. मात्र त्यानंतर जवळपास दहा महिने उलटूनही घरकुल बांधकाम सुरू न झाल्याने संबंधित कुटुंबांना भाड्याच्या घरात राहावे लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लाभार्थ्यांनी पुढे सांगितले की, ८ मे २०२६ रोजी ऑनलाईन अर्ज सादर करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर २२ मे रोजी पुन्हा निवेदन देत जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात आला, तरीही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भुसावळ पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे लाभार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून घरकुलांचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या उपोषणात सौ. नीता राजू सोनवणे, अरुणा दाभाडे, सुरेखा गागाराम अठवले, रेखा प्रशांत गुरचळ, अलका सुनिल रायमोळे यांच्यासह अन्य लाभार्थी सहभागी झाले आहेत.



