
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री संत मुक्ताबाई यांचे मूळ समाधीस्थळ असलेल्या कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई पुरातन मंदिराच्या नामफलकावर ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता नामफलकावर ‘श्रीक्षेत्र कोथळी, ता. मुक्ताईनगर’ असा उल्लेख कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी सर्व भाविक भक्त आणि कोथळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे कोथळी परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संत परंपरेतील महान संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चार भावंडांपैकी श्री संत मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. श्री संत मुक्ताबाईंचे मूळ समाधीस्थळ कोथळी येथे असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. त्यामुळे कोथळी ही संत मुक्ताबाईंच्या पावन भूमी म्हणून राज्यभरातील वारकरी आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानली जाते. दरवर्षी प्रत्येक एकादशीला तसेच विविध धार्मिक प्रसंगी महाराष्ट्रासह विविध भागांतून लाखो भाविक भक्त कोथळी येथे येऊन श्री संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन घेतात. या स्थळाला असलेले धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘श्रीक्षेत्र कोथळी’ ही ओळख कायम राहावी, अशी भावना ग्रामस्थ आणि भाविक व्यक्त करत आहेत. मात्र, मंदिर परिसरातील नामफलकावर ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख करण्यात आल्याने कोथळी ग्रामस्थ आणि भाविकांनी आक्षेप घेतला आहे. मूळ मंदिर देवस्थान आणि समाधीस्थळ हे कोथळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असताना गावाचे नाव बाजूला सारून केवळ ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख करणे हे कोथळीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ओळखीवर अन्याय करणारे असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
भाविक आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, श्री संत मुक्ताबाईंच्या वारशाचे आणि या पवित्र स्थळाच्या ऐतिहासिक ओळखीचे जतन करण्यासाठी नामफलकावर ‘श्रीक्षेत्र कोथळी, ता. मुक्ताईनगर’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच नामफलकात करण्यात आलेला बदल संबंधितांनी स्वतःहून दुरुस्त करून परंपरेनुसार योग्य उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. श्री संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वी या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा आणि नामफलकात आवश्यक बदल करून भाविकांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नामफलकाच्या या वादामुळे कोथळी परिसरात चर्चांना उधाण आले असून, प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन यावर कोणती भूमिका घेणार याकडे भाविक भक्त आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. श्री संत मुक्ताबाईंच्या पवित्र समाधीस्थळाची ऐतिहासिक ओळख अबाधित ठेवण्यासाठी ‘श्रीक्षेत्र कोथळी’ हे नाव कायम ठेवण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. श्री संत मुक्ताबाई पुरातन मंदिराच्या नामफलकावर ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख झाल्याने निर्माण झालेल्या वादात कोथळी ग्रामस्थ आणि भाविकांनी ‘श्रीक्षेत्र कोथळी’ ही पारंपरिक ओळख कायम ठेवण्याची मागणी केली असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.



