Home प्रशासन दिवाळीच्या गर्दीत मुक्ताईनगरमध्ये अवजड वाहतुकीला मोकळे रान ; पोलीस नियोजनावर प्रश्नचिन्ह

दिवाळीच्या गर्दीत मुक्ताईनगरमध्ये अवजड वाहतुकीला मोकळे रान ; पोलीस नियोजनावर प्रश्नचिन्ह

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाची लगबग आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली असताना शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन अपेक्षित असताना अवजड वाहनांची शहरातून सुरू असलेली ये-जा पाहता पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ असून महिला, लहान मुले आणि पादचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून अवजड वाहने धावत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात अवजड वाहनांना शहराबाहेरील पर्यायी मार्गाने वळविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजनांचा अभाव जाणवत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, पूर्णाड फाटा आणि बोदवड चौफुली येथे वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही अवजड वाहने शहरात प्रवेश करतातच कशी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त असतानाही शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहणे ही बाब नियोजनातील त्रुटींकडे लक्ष वेधणारी ठरत आहे. गर्दीच्या वेळी अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, अपघाताचा धोकाही वाढू शकतो. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. विशेषतः गर्दीच्या रस्त्यांवरून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा सुरू असताना अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दिवाळी सण आणि गर्दीच्या काळात अवजड वाहनांची शहरातील वाहतूक बंद करावी किंवा त्यांना पर्यायी मार्गाने वळवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पूर्णाड फाटा आणि बोदवड चौफुली येथे तैनात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस कर्मचारी तैनात असतानाही अवजड वाहने शहरात प्रवेश करत असतील, तर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल मुक्ताईनगरकरांकडून उपस्थित केला जात आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound