यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल प्रादेशिक वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास योजना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागातील हंगामी आणि बारमाही झऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी जवळपास १४ वनरक्षकांना ‘एन्युमरेटर्स’ म्हणून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या १४ वनरक्षकांना अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पुरवलेल्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने झऱ्यांचे जिओ टॅगिंग करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या जिओ टॅगिंगमुळे प्रथमच संपूर्ण विभागातील हंगामी आणि बारमाही झऱ्यांची अचूक नोंदणी होणार आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी नियोजन करताना मदत होणार आहे. तसेच, वन विभागालाही पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि जलमृद कामांमध्ये या माहितीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करता येणार आहे.
सातपुडा पर्वताच्या क्षेत्रात अशा प्रकारे झऱ्यांचे जिओ टॅगिंग पहिल्यांदाच होत असल्याने, या मोहिमेसाठी वन विभागाकडून संबंधित वनरक्षकांना आवश्यक वाहने आणि इतर आवश्यक सामग्री पुरवली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सहाय्यक भूवैज्ञानिक सुधीर जैन आणि जीआयएस सहाय्यक महेंद्र बाविस्कर यांनी अँड्रॉइड फोनद्वारे प्रत्यक्ष ॲप्लिकेशनमध्ये माहिती कशी संकलित करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले. या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठकीला यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वनजीव प्रथमेश हाडपे, प्रादेशिक व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा समाधान पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा बी. के. थोरात यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावल प्रादेशिक वनविभाग, जळगाव आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही माहिती संकलित केली जाणार आहे. सातपुड्यातील नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वनजीव प्रथमेश हाडपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.