जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येत असलेल्या एका आयशर चालकाने रस्त्यात अनेक वाहनांना धोकादायक पद्धतीने कट मारल्याने संतप्त वाहनचालकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, शहराच्या अजिंठा चौफुलीवर आल्यानंतर या आयशरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. सुदैवाने दुचाकीस्वार मागील चाकाखाली येऊनही पुढे ढकलल्या गेल्याने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर संतप्त जमावाने आयशर चालकाची चांगलीच धुलाई केली. हा थरारक प्रकार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.
छत्रपती संभाजीनगरकडून येत असलेल्या आयशर चालकाने रस्त्याने अनेक वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केले. यामुळे संतप्त झालेल्या वाहनचालकांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला. हा आयशर चालक शहराच्या अजिंठा चौफुलीजवळ पोहोचल्यानंतर तो ईच्छादेवी चौफुलीकडे जाण्यासाठी वळला. त्याचवेळी रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला त्याच्या वाहनाची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार थेट आपल्या दुचाकीसह आयशरच्या मागील चाकाखाली आला.
अजिंठा चौफुलीवर ड्युटीवर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी रवींद्र कोळी आणि इतर नागरिकांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करत आयशर थांबवण्याचा प्रयत्न केला. आयशरच्या धडकेनंतर दुचाकीस्वार चाकाखाली आला, परंतु त्याला जोरदार धक्का बसल्याने तो आयशरच्या दोन्ही चाकांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पडला आणि त्याचे प्राण वाचले. मात्र, त्याची दुचाकी आयशरच्या चाकाखाली आल्याने तिचा पूर्णपणे चुराडा झाला.
दुचाकीला चिरडल्यानंतरही आयशर चालक तेथून भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तो भुसावळच्या दिशेने जात असताना वाहतूक पोलीस रवींद्र कोळी यांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबवले. पाठलाग करत असतानाही या चालकाने अनेक वाहनांना कट मारून त्यांचे नुकसान केले. यामुळे अधिकच संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळी त्याला घेरले आणि त्याची चांगली धुलाई केली. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.