जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यात भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना मदत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या निखिल अनिल कोळी (वय २२, रा. रिधूर, ता. जळगाव) या तरुणाला चांगलीच फसवणूक झाली आहे. अज्ञात दोघांनी त्याची दुचाकी (एमएच १९, डीएक्स ४५४०) आणि डिक्कीत ठेवलेला आयफोन चोरून नेला. ही घटना १३ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील उस्मानिया पार्क परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिधूर येथील रहिवासी असलेला निखिल सेंट्रींगचे काम करतो. १३ मे रोजी सायंकाळी काम संपल्यावर तो सुभाष चौकात बाजारासाठी गेला होता. त्यानंतर त्याचा मित्र गणेश दिलीप सोनवणे (रा. श्रीराम चौक) याला भेटण्यासाठी गेला. रात्री जेवणानंतर तो सुमारे दहा वाजता घरी परतण्यासाठी निघाला होता.
शिवाजी नगर उड्डाणपुलावरून जात असताना त्याला दोन अनोळखी इसम भेटले. त्यांनी निखिलला पुलाच्या पलीकडे सोडण्याची विनंती केली. मदतीच्या भावनेतून निखिलने त्या दोघांना आपल्या दुचाकीवर बसवून घेतले. त्यांनी पुलाच्या पलीकडे उतरल्यावर आणखी थोडे पुढे, उस्मानिया पार्कपर्यंत सोडण्यास सांगितले. उस्मानिया पार्कजवळ एका टपरीवर ते सिगारेट आणि पान घेण्यासाठी थांबले. निखिलही टपरीवर पानसुपारी घेण्यासाठी उतरला. याच संधीचा फायदा घेत त्या दोघा अनोळखी इसमांनी निखिलची दुचाकी आणि डिक्कीत ठेवलेला महागडा आयफोन चोरून तेथून पळ काढला.
पानसुपारी घेऊन परतल्यावर निखिलला आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. त्याने आजूबाजूच्या परिसरात बराच शोध घेतला, परंतु दुचाकी आणि मोबाईलचा काही पत्ता लागला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निखिलने बुधवारी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.