गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयिताच्या मुसक्या आवळल्या !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पांडुरंग टॉकीज परिसरात गावठी पिस्टलासह फिरणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रणजीत किशोर चंडाले (वय-३७, बात्तर खोली, वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग टॉकीज परिसरात संशयित आरोपी रणजीत चंडाले हा गावठी पिस्टल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी पांडुरंग टॉकीजजवळील इंडिया बॅटरी दुकानासमोरून संशयित रणजीत किशोर चंडाले याला अटक केली. त्याच्याजवळून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस हस्तगत केले. याप्रकरणी मंगळवारी १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजता कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.

Protected Content