Home क्राईम ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लूट करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश ;...

ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लूट करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश ; जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या वेगवान आणि धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक २० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०, रा. जालना) हे MH-21-BH-3536 क्रमांकाच्या ट्रकने पाळधी परिसरातून जात असताना चार अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या या आरोपींनी ट्रकवर दगडफेक करत चालक व क्लीनरला बेदम मारहाण केली. हल्ल्यादरम्यान मुख्य आरोपी शेख साहील शेख जब्बार उर्फ काल्या याने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले. आरोपींनी चालकाच्या खिशातील ५५०० रुपये रोख रक्कम आणि फोनपे स्कॅनरद्वारे ९८४ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून लूट केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चालकावर सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथक तात्काळ रवाना केले. गुप्त माहिती आणि जलद तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत तीन मुख्य आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (वय २६, रा. पाळधी), विशाल चुडामण पाटील (वय १८, रा. जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे.

तपासात समोर आले की मुख्य आरोपी साहिल शेख उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विशाल पाटील याच्यावर दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या टोळीची क्रूरता अधोरेखित झाली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस हवालदार प्रदीप राजपूत, योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पंकज देशमुख, प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे आणि गणेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound