यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी डिंपल दीपक निकम हिने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या या लहान विद्यार्थिनीच्या या कामगिरीमुळे संपूर्ण दहिगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहिगाव तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या डिंपल निकम हिने अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत यावल तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. विशेष म्हणजे, राज्य पातळीवरही तिने ३३ वा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, ज्यामुळे तिच्या शैक्षणिक क्षमतेची सर्वत्र दखल घेतली जात आहे.

डिंपलच्या या यशाबद्दल शाळेतर्फे विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांच्या हस्ते तिला स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामागे केंद्रप्रमुख विजय ठाकूर, वर्गशिक्षिका सोनाली चौधरी तसेच डिंपलचे आई-वडील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असल्याचे नमूद करण्यात आले. घरातील शिस्त, शाळेतील योग्य मार्गदर्शन आणि नियमित अभ्यास यामुळे तिने हे यश मिळवले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी डिंपलच्या यशाचे कौतुक करत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिकांनीही तिच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. डिंपल निकमचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, लहान वयात मिळवलेली ही मोठी कामगिरी तिच्या मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्याचे प्रतीक मानले जात आहे.



