Home Cities जळगाव जळगावात  १००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप 

जळगावात  १००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप 

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत १००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप करण्यात आले. कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता केवळ समाजसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार सुरेश भोळे यांनी यंदा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. वाढदिवसानिमित्त होणारी होर्डिंग्ज, बॅनरबाजी टाळून समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या दान करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण १००० वह्यांचे संकलन केले.

या उपक्रमाच्या निमित्ताने रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिताताई वाघ, महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे तसेच अनेक नगरसेवक व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गोविंद चौधरी आणि उदय भालेराव यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी तसेच विविध आघाडींचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जळगाव शहरातील शेकडो विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हातात वह्या आणि दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आमदार सुरेश भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound