गडचिरोली । शासनाने राज्यातील शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना अंमलात आणल्या असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे यांनी केले. ते चामोर्शी येथील शिवारातील भेटी प्रसंगी बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, भाऊसाहेब बर्हाटे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लागलीच विविध तालुक्यांना भेट देऊन शेतकर्यांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने त्यांनी नुकतीच चामोर्शी तालुक्यातील शेतकर्यांची भेट घेतली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे यांनी चामोर्शी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व तालुका फळरोप वाटिका कृष्णनगर येथे भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी तरंग शेतकरी उत्पादक कंपनी, भेंडाळा येथे भेट दिली. तर, भेंडाळा येथील मागेल त्याला शेततळे योजनेमधून देण्यात आलेल्या तळ्यांमध्ये मत्सव्यवसाय करणार्या शेतकर्यांशी चर्चा केली.त्यानंतर आमगाव कार्यक्षेत्रातील धान पिकावरील कीड व रोग याची पाहणी केली.