जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम करणाऱ्या १६८ अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तब्बल १९ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६८ अंगवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे.
बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत असून पिढी घडवण्यात अंगणवाडी ही मोलाचे योगदान देते. मात्र अनेक अंगणवाड्यांनी स्वत:च्या वास्तू देखील नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून १६८ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तब्बल १९ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६८ अंगवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे.
मागील ३ महिन्यांपूर्वी १०८ अंगणवाड्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बाला ( बिल्डींग ऍज लर्नींग एड ) या अभिनव उपक्रमानुसार एका अंगणवाडीच्या इमारतीसाठी ११ लक्ष २५ हजार या प्रमाणे १६८ प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. यातील ८ लक्ष ५० हजार रूपये अंगणवाडीच्या बांधकामासाठी तर २ लक्ष ७५ हजार रूपये बाला उपक्रमासाठी प्रदान करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ १६ कोटी ८० लक्ष निधी जि.प.कडे वितरित केला असल्याने जिल्ह्यात बाला या अभिनव उपक्रमाप्रमाणे आधुनिक पद्धतीने अंगणवाडी बांधकाम होणार असल्याने बालकांना मोठा फायदा होणार आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. मागील ३ महिन्यापूर्वी ५२९ अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती नव्हत्या. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे बाला या संकल्पनेनुसार अंगणवाड्या बांधकाम मंजुरी बाबत चर्चा करून डीपीडीसी मधून अतिरिक्त निधीची केली होती. त्यानुसार बाला या संकल्पनेनुसार १६८ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ५२९ अंगणवाड्यांपैकी मागील ३ महिन्यात १०८ व आता १६८ अश्या २७६ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम बाकी असलेल्या २५५ अंगणवाड्या बांधकामासाठी एकाच टप्यात या वर्षी निधी मंजूर करणार असल्याचा संकल्प देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.१००% निधी मंजूर करून अंगण वाड्यांसाठी १००% स्वतःच्या इमारती असलेला जळगाव जिल्हा असेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर मंजूर अंगणवाड्याचे बांधकाम मुदतीत व दर्जेदार पद्धतीने बांधकाम करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
बाला उपक्रमाप्रमाणे तालुका निहाय मंजूर अंगणवाड्या –
ज्या अंगणवाडी केंद्र उघड्यावर, भाड्याच्या रूम मध्ये, एकत्र किंवा ग्रामपंचायत इमारतीत भरत होत्या जिल्ह्यातील अश्या १६८ अंगणवाड्याना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जिल्ह्यात १६८ अंगणवाड्या इमारत बांधकामसाठी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात अमळनेर – ०८ , भडगाव -१० , भुसावळ – ०५, चाळीसगाव – १५ , चोपडा – १५ , धरणगाव – ०९, एरंडोल – ०९ , जळगाव -११, जामनेर – १८ , मुक्ताईनगर – १३ , पाचोरा – २० , पारोळा – १५ , रावेर – १० व यावल १० अश्या १६८ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांना शैक्षणिक दृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्च २०२३ पर्यंत १००% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती मिळणार !
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राउत व मुख्य कार्यकारी अधिकारी ,डॉ पंकज आशिया यांनी अंगणवाड्या , अंगणवाडी इमारतीपैकी उर्वरित २५५ अंगणवाड्याना १००% इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यासाठी डीपीडीसी मार्फत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच सुतोवाच केले होते. त्यामुळे १००% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती असलेला जिल्हा म्हणून जळगावचा लौकीक होणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी याबाबत सूक्ष्म नियोजन केलेले आहे.
असा आहे ‘बाला’ उपक्रम –
बालकांना शब्दांपेक्षा चित्रांची भाषा अधिक चांगली कळते. बालवयात चित्रमय पध्दतीत शिकवल्यास याचा अतिशय चांगला इंपॅक्ट होतो आणि बालके शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकत असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. या अनुषंगाने बिल्डींग ऍज लर्नींग एड म्हणजेच बाला ही संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत प्राथमिक विद्यामंदिराच्या परिसरात चित्रांच्या माध्यमातून विविध बाबी या अतिशय आकर्षक पध्दतीत रेखाटण्यात येतात. नेमका हाच उपक्रम आता जळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा १६८ अंगणवाड्यांमध्ये अंमलात येणार आहे.
अशी असेल सुसज्ज अंगणवाडी –
जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या अंगणवाडीत हवेशीर आणि सुटसुटीत बांधकाम असेल. यात सेप्टीक टँकसह शौचालय, स्वतंत्र प्रसाधनगृह, बालकांच्या स्वच्छतेसाठी हँडवॉश सेंटर, वस्तू ठेवण्यासाठी माळा, ओट्याने युक्त असणारे किचन, सामान ठेवण्यासाठी कडप्प्याचे कपाट आदी बाबींचा समावेश असेल. यासोबत अंगणवाडीच्या बाहेर लहान आकाराच्या कुंड्या, पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी वीजरहीत पाणी शुध्दीकरण केंद्र, झाडू, खराटा, पोछा आदी साहित्य ठेवण्याची सुविधा असेल. तर, बाला उपक्रमाच्या अंतर्गत बालकांना आकर्षीत करेल अशा प्रकारे फळे, फुले, कार्टुन आणि आकर्षक चित्रांचे थ्रीडी या प्रकारातील रेखाटन करण्यात येणार आहे.