रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी रावेर पंचायत समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. राज्य सरकारने १०० दिवसांच्या आत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अभियान हाती घेतले असून, त्याअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
३,२१४ लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता
तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता रावेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेर तालुक्यासाठी ४,११३ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत ३,९१४ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील ३,२१४ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा १५,००० रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे, तर तांत्रिक अडचणींमुळे ७०० लाभार्थी अद्याप वंचित आहेत, अशी माहिती योजनेचे प्रभारी अधिकारी श्री. सपकाळे यांनी दिली.
नागरिकांच्या तक्रारी आणि कारवाईची मागणी
दरम्यान, रावेर तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंचायत समितीत पैशांशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. गरीब व गरजू नागरिकांचे शोषण थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असली तरी काहींना अद्यापही तांत्रिक कारणांमुळे निधी मिळालेला नाही, याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशीही मागणी करण्यात आली.
योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमाद्वारे गरजू कुटुंबांना घरकुल उभारणीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लवकरात लवकर सर्व पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण निधी मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करत असल्याचेही गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.