चाळीसगाव प्रतिनिधी । राजमाने दहीवद रस्त्यावर जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून तलवारीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कुणाल योगेश पाटील वय-२४ रा. राजमाने ता. चाळीसगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती आणि दुधाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतो. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कुणाल पाटील हा राजमानेहून दहिवद येथे दूध घेण्यासाठी जात होता. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून गौरव एकनाथ पाटील, कुणाल एकनाथ पाटील व त्याच्या सोबत असलेले अनोळखी दोन जण हे चार चाकी वाहनाने येऊन दुचाकीला धडक दिली. तसेच कुणाल पाटील याला पकडून त्याला लोखंडी रॉड आणि पाईपाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यातील कुणाल पाटील याने चारचाकी वाहनातून तलवार काढून कुणाल एकनाथ पाटील यांच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कुणाल पाटील याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता त्याने फिर्यादी केली. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गौरव एकनाथ पाटील, कुणाल एकनाथ पाटील आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती सर्व रा. राजमाने ता.चाळीसगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.