नवी दिल्ली-वृत्तसंस्था | डाव्या विचारधारेच्या दहशतवादापासून देशाला लवकरच मुक्ती मिळेला असा आशवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या ५९ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये सलामी घेतल्यानंतर शाह यांनी उपस्थित जवानांना संबोधित केले. ते म्हणाले की, भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील आणि या दोन्ही आघाड्यांवर सुमारे ६० किलोमीटरच्या परिसरात मोकळ्या जागेवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील दोन्ही सीमेवर ६० किमीच्या परिसरात काही भाग वगळता पूल बांधले जात आहेत. येत्या दोन वर्षांत आम्ही या दोन्ही सीमा पूर्णपणे सुरक्षित करू, असे शाह म्हणाले.
शहा म्हणाले की, माओवाद्यांनी चालवलेल्या सशस्त्र आणि हिंसक मोहिमेचा अंत आता जवळ आलेला आहे. गेल्या दहा वर्षांत नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना ५२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, या घटनांमधील मृत्यू ७० टक्क्यांनी कमी झाले आहेत आणि प्रभावित पोलिस ठाण्यांची संख्याही ४९५ वरून १७६ वर आली आहे. लवकरच या विचारधारेपासून मुक्ती मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा भाजपचे कोणतेही सरकार सत्तेवर आले तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले, मग ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार ! अटलजींच्या सरकारने सीमेवर एकच फौज तैनात करण्याची योजना आणली होती, तर मोदी सरकारने सीमाभागात राहणार्या स्थानिक लोकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आणि सुरक्षा, विकास आणि लोकशाही प्रक्रियेसह भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असे शाह यांनी नमूद केले.