‘स्वातंत्र्य सैनिक’ मोदींना पेन्शन व ताम्रपट मिळायला हवे- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । बांगलादेशच्या स्वातंत्र्य युध्दात सहभागी झाल्यामुळे ‘स्वातंत्र्य सैनिक’ नरेंद्र मोदी यांना पेन्शन व ताम्रपट मिळायला हवे अशी खोचक मागणी आज शिवसेनेने केली आहे. तर, पंतप्रधानांच्या बांगलादेश दौर्‍यामुळे तेथील हिंदू हा अधिक असुरक्षित झाल्याचा आरोप देखील केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौर्‍यावर गेल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात यावर आज भाष्य करण्यात आलेले आहे. यात म्हटले आहे की, प. बंगालात निवडणुकांचे रण पेटले असतानाच पंतप्रधान मोदी हे बाजूच्याच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊन आले. बांगलादेशमध्येही मोदी हे तेथील जशोरेश्वरी कालिमाता मंदिरात जाऊन बसले. त्यांनी पूजाअर्चा केली. हे चित्र प. बंगालातल्या हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठीच असावे. एका मुस्लिम देशातील मंदिरात हिंदुस्थानी पंतप्रधानाने अधिकृतपणे दर्शनासाठी जाणे हे मोदीप्रेमींना नक्कीच रोमांचकारी वाटू शकते. राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

यात पुढे म्हटले आहे की, प. बंगालातील विधानसभा निवडणुका भाजपने म्हणजेच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असे शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आले नाही. आश्चर्य असे की, त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केले आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होऊन आपण तुरुंगवासही भोगल्याची ऐतिहासिक माहिती मोदी यांनी दिली. 20-22 वर्षांचे असताना आपण हा सत्याग्रह केल्याची माहिती मोदी यांनी दिली. त्यामुळे त्यांचे भक्त नक्कीच थरारून गेले असतील. इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केला, यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य महत्त्वाचे असे भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते. ‘‘बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचारांची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती,’’ असे मोदी यांनी ढाक्यात सांगितले.

पंतप्रधान हे कमालीचे हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून गाझीपूर सीमेवर शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात ऊन, वारा, पावसात रस्त्यावर बसले आहेत. तेथे त्यांचे बळी गेले. अत्याचार सहन करीत हे शेतकरी तेथे बसले आहेत. याचे दुःख आपल्या पंतप्रधानांना होतच नसेल असे कसे म्हणता येईल? देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा.

यात पुढे नमूद केले आहे की, मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. कट्टरतावादी इस्लामी गटांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे. हिंदू वसाहतींवर हल्ले सुरू झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. सरकारी कार्यालये, लोकल ट्रेन्स, प्रेस क्लबवरही हल्ले करण्यात आले आहेत. मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे. पंतप्रधान मोदी बांगलादेशात जाऊन आले, पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला. पंतप्रधान मोदी ढाक्याला गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यासाठी गेले, पण तेथे शांततेची होळीच पेटली. मोदींनी जशोरेश्वरी मंदिरात जाऊन पूजा केली, पण आता तेथील मंदिरेच तोडण्यात आली याची तर्कसंगती कशी लावणार? शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय.

Protected Content