जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या प्रशिक्षण मंडळाशी मिळते-जुळते नाव असलेली संस्था स्थापन करून विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम चालवण्यासाठी शुल्क घेत व शासनाचा लोगो असलेले बनावट प्रमाणपत्र देत शासन तसेच उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला दुपारी 4 वाजता अटक करण्यात आली आहे. धनंजय दिनकर कीर्तने (रा. त्र्यंबकनगर, महाबळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०११ मध्ये व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ अशा नावाची कीर्तने धनंजय कीर्तने याने एनजीओ स्थापन केली. दुसरीकडे शासनाची ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ’ या नावाचे मंडळ आहे. या नावाशी मिळते-जुळते नाव संबंधित एनजीओचे असून ही खासगी संस्था असतानाही सरकारी अभ्याकक्रमासाठी परवानगी व प्रमाणपत्र देऊ शकतो, असे लहान-लहान प्रशिक्षण संस्थांना सांगितले. यामध्ये आमच्याकडे १३० अभ्यासक्रम असल्याचेही सांगून तशी परवानगी देऊ शकतो, असेही भासवले.
यात व्यवसाय शिक्षणाशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून शुल्क आकारत त्यांना मान्यता दिली. तसेच उमेदवारांना प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले. यात शासनाचा लोगो वापरून व शासकीय नावाचे बनावट प्रमाणपत्र छापून ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यात शासनाची, उमेदवारांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले.
या प्रकरणी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संजयकुमार माधवराव पाटील (५७, रा. प्रतापनगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या संस्थेचे धनंजय दिनकर कीर्तने, सोनाली अमृत दहिभाते, अनिता धनंजय कीर्तने (सर्व रा. त्र्यंबकनगर) या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत. या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्यांपैकी धनंजय कीर्तने याला अटक करण्यात आले.