लोंढरी तांडा येथील कापूस शेतकऱ्यांची फसवणूक

पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी) पहूर जवळील लोंढरी तांडा व शेंगोळा येथील कापूस व्यापाऱ्यांनी दीडशे क्विंटलमागे २५ ते ३० क्विंटल कापूस चोरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांनी व्यापाऱ्यांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोंढरी तांडा आणि शेंगोळा येथे धुळे येथील काही व्यापारी कापूस खरेदी करण्यासाठी आले होते .जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे काही शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून सदर व्यापारी जवळच असलेल्या लोंढरी येथे आले. लोंढरी तांडा येथे कापूस मोजला जात असताना दर तोल मागे ९ ते १० किलो अशाप्रकारे क्विंटल मागे साधारण पंचवीस किलो कापूस शेतकऱ्यांचा कमी मोजला जात होता, मापात पाप होत असल्याची ही बाब लोंढरी तांडा येथील शेतकरी नामदेव राठोड यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच पोलीस पाटील पती डॉ. सुभाष चिकटे यांना माहिती दिली. आपले पितळ उघडे पडले असल्याची खात्री होताच व्यापाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्थानिक रहिवाशांनी त्यांना एका घरात कोंडून ठेवले. नामदेव राठोड यांनी पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेतली. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना त्यांच्या गाड्यांसह ताब्यात घेऊन चौकशी कमी पहूर पोलिस स्टेशन येथे आणले. यामध्ये  ज्ञानेश्वर सोना राठोड , शेषमल राठोड, आत्माराम राठोड, प्रकाश जाधव आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आधीच अस्मानी सुलतानी संकटांशी संघर्ष करत शेतकरी बांधव कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातच कापूस मोजणी करत असताना मापात पाप करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली आहे.

 

Protected Content