दहिगाव येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोघांवर उपचार सुरू

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या बाधेमुळे तालुक्यातील दहिगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून दोघांवर उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

तालुक्यातील दहिगाव येथील एका वृध्दाचा शुक्रवारी मृत्यू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू होता. विशेष बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबातील हा कोरोनामुळे दगावल्याचा चौथा बळी आहे. या आधी संबंधीत व्यक्तीचा भाऊ व वहिनी आणि नंतर त्यांची पत्नी कोरोनामुळे मृत झाले आहेत. यानंतर संबंधीत व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. याच कुटुंबातील अजून दोन व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याआधी तालुक्यातील साकळी या गावात कोरोनाचा मोठा संसर्ग दिसून आला होता. या पाठोपाठ आता दहिगाव हे हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. साकळी, म्हैसवाडी, भालोद , न्हावी, किनगाव आदी गावांमध्ये कोरोना संसर्गाने आपला प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढला आहे. तर ग्रामीण भागात मृतांची संख्या देखील लक्षणीय आहे. आजवर किनगाव दोन, न्हावी दोन, पाडळसा एक, म्हैसवाडी एक, कोरपावली एक, भालोद एक, साकळी चार आणी दहिगाव चार इतके रूग्ण दगावले आहेत.

तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या प्रतिकारासाठी लढा देत आहेत. स्वत: प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर व पोलीस निरिक्षक धनवडे यांच्या जोडीला आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत. कोरोनाची बाधा वेळेत उपचार झाल्यास बरी होऊ शकते. यामुळे नागरिकांनी अगदी थोडी लक्षणे जरी दिसली तरी तातडीने चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content