बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी

 

जळगाव,प्रतिनिधी । येथील लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींचे वसतीगृह येथे सुरू झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला आज रविवार रोजी ९० कोरोना रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून बारकाईने तपासणी करण्यात आली.

काही रुग्णांना या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने आवश्यक त्या मेडिसिन लिहून दिल्यात. त्या मेडिसिन बहिणाबाई कोविड केअर सेंटरतर्फे मोफत दिल्या जाणार आहेत. अत्यंत स्वच्छता व चांगल्या पद्धतीने रुग्णांची काळजी हे बहिणाबाई कोविड केअर सेंटर घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.विलास भोळे म्हणाले की , या कोविड केअर सेंटरचे सर्व पदाधिकारी रुग्णांच्या देखभालीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.सेंटरची वैद्यकीय टीम रुग्णांवर योग्य उपचार देत असून रुग्णही खूप समाधानी असल्याचे पाहणीत आढळून आले आणि हे पाहून मला खूप आनंद झाला. या कोरोना महामारीत पदाधिकारी मोठ्या धैर्याने सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे आले आहेत, खरे लढवय्या म्हणजे निस्वार्थ भावनेने झटणारे पदाधिकारीच आहेत असे सांगून डॉ.भोळे गौरवोद्गार काढले.

प्रतिभा शिंदे यांनी रुग्णांची विशेष तपासणी करण्यासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांचे आभार मानताना सांगितले की , येथे आलेले डॉक्टर्स हे ” शरीराचे ,समाजाचे आणि मनाचे डॉक्टर्स आहेत.” खूप व्यस्त असतांनाही या बहिणाबाई कोविड सेंटरला सेवा देण्यासाठी ते आलेत , या सामाजिक प्रयत्नांचे कौतुक करून यापुढेही आम्ही सेवा देण्यासाठी तत्पर राहू असा शब्द त्यांनी दिला आहे.  अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.जितेंद्र कोल्हे यांनी बहिणाबाई कोविड केअर सेंटर हे रुग्णांसाठी झटते आहे , याबद्दल समाधान व्यक्त केले तर छातीविकार तज्ज्ञ डॉ.चेतन चौधरी आणि युरोसर्जन डॉ.अनिल पाटील या सेंटरचा परिसर निसर्ग सानिध्यात आहे , येथील परिसरात शुद्ध हवामान असून रुग्णांची अत्यंत व्यवस्थित काळजी घेतली जाते , रुग्णांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद दिसून आला असे सांगून अनेक रुग्णांशी त्यांनी संवाद साधला आणि काही रुग्णांनी अजून काय औषधी घ्यावीत , काय काळजी घ्यावी ? हे सुचविले तशा सूचनाही त्यांनी सेंटरचे डॉ. परीक्षित पवार , सचिन धांडे ,नर्स स्टाफ यांना दिल्यात.

युरोसर्जन डॉ.अनिल पाटील , स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.विलास भोळे , छाती विकार तज्ज्ञ डॉ.चेतन चौधरी ,अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्यासह इतरही डॉक्टर्स येणार असून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, त्यांना योग्य ती मेडिसिनही दिली जाणार आहे. या बहिणाबाई कोविड केअर सेंटरचे पदाधिकारी प्रतिभाताई शिंदे , चंदन कोल्हे , सचिन धांडे , चंदन अत्तरदे , विनोद देशमुख,  अभिजित महाजन , भरत कर्डिले , तुषार वाघुळदे , राजेश पाटील , गौरव राणे ,हितेश पाटील , संदीप पाटील , ऍड. पुष्कर नेहते , भूषण बढे ,किरण वाघ ,प्रमोद पाटील ,पराग महाजन ही तरुण टीम समर्थपणे सांभाळत आहेत.

Protected Content