बांधकामाचे साहित्य चोरणारे चौघे अटकेत; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवरुन बांधकामाचे साहित्य लांबविल्याची घटना १३ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. या संशयितांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव- औरंगाबाद या रस्त्याचे काम स्पैरोधारा इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहेत. रस्त्याचे सद्यस्थिती एमआयडीसीतील मानराज मोटर शोरुमजवळ लहान पूलाचे काम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणाहून १३ जून रोजी पहाटेच्या सुमारास बांधकाम साहित्याची चोरी करुन ते साहित्य काही जण रिक्षातून घेवून गेले. वॉचनमने पाठलाग केला परंतू ते हाती लागले नाहीत. चोरट्यांनी याठिकाणाहून ५० हजाराच्या १० लोखंडी प्लेट, २ हजार ७०० रुपयांचे ९ युजॅक, १ हजार ८०० रुपयांचे ३ एम.एस.पाईप, ४० हजार रुपये किंमतीचे १० क्रीप्स असे बांधकामाचे साहित्य लांबविल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कंत्राटदार शेख रफिक शेख रऊफ यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात काल रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता गुन्हा दाखल झाला होता.

बांधकामाचे चोरीचे साहित्य सागर फुलचंद जाधव वय १९ रा. रामेश्‍वर कॉलनी व धिरज जगदीश ठाकूर वय २१ रा. श्रीकृष्ण नगर हे विक्री करण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील भंगाराच्या दुकानावर येत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सुधीर साळवे, असीम तडवी, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांच्या पथकाने चोरीचा माल प्रत्यक्ष विक्री करताना सागर जाधव व धिरज ठाकूर या दोघांना रंगेहाथ पकडले होते. त्यांनी गुन्ह्याची कबूली देवून बांधकामाच्या साईटवरुन चोरलेला संपूर्ण माल हा एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कॉलनी व आर.एल.चौफुली परिसरात भंगार व्यावसायिकांना विकल्याची कबूली दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुर्नवासी पाल्हाद पासवान वय ४० रा. आनंद बॅटरी शेजारी, गोपाल दाल मिल समोर, एमआयडीसी व इम्रान सादीक खाटीक वय ३० रा. मोहम्मदीया नगर, गुलाब बाबा कॉलनी, जळगाव या दोघा भंगार व्यावसायिकांना अटक केली होती. चारही संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content