


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगावच्या सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नेतृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली आहे. रोटरी जिल्हा ३०३० च्या District RY 2025–26 Awards मध्ये क्लबने तब्बल पाच प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रोटरी जिल्हा ३०३०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नाना शेवाळे तसेच डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह (DRR) रोटरॅक्टर राघव पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. रोटरी जिल्हा ३०३० हा नाशिक ते नागपूरपर्यंत विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र व्यापणारा जिल्हा असून, या अंतर्गत सुमारे ११० रोटरॅक्ट क्लब कार्यरत आहेत. या सर्व क्लबमधून उत्कृष्ट सेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्वाच्या आधारे रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव यांची निवड होणे ही जळगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. क्लबच्या शिक्षणविषयक ‘नन्हीकली’ या विशेष उपक्रमाला ‘सर्वोत्कृष्ट साक्षरता व शिक्षण संस्था’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित घटकांसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली. तसेच ‘आभा सेवा’ या समाजोपयोगी उपक्रमाला ‘सर्वोत्कृष्ट क्लब प्रकल्प’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या अध्यक्षा रोटरॅक्टर भूमिका नाले यांना त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व कौशल्यासाठी ‘उत्कृष्ट अध्यक्ष (Silver Award)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच क्लबला ‘DRR Citation’ आणि ‘Best Supporting Club for District Initiatives’ ही मानाची प्रमाणपत्रेही प्राप्त झाली. या यशामागे क्लबच्या प्रत्येक सदस्याची मेहनत, सेवाभाव, संघभावना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरली आहे. विविध सामाजिक प्रकल्प, शैक्षणिक उपक्रम आणि समाजहिताच्या कामांमध्ये सदस्यांनी दिलेल्या योगदानामुळेच क्लबने हा गौरवास्पद टप्पा गाठला आहे.
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे. क्लबची पालक संस्था रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि सातत्यपूर्ण सहकार्य या यशामागे महत्त्वपूर्ण ठरले असून, क्लबने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. “एकत्र सेवा केली, एकत्र प्रगती केली आणि एकत्र उत्कृष्टतेचे शिखर गाठले” या ब्रीदाला साजेशी ही कामगिरी असून, भविष्यातही समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे विविध उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटने व्यक्त केला आहे.



