


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरालगत झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिराच्या पूजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. ते आरपीडी रस्त्यालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये पूजारी म्हणून सेवा बजावत होते.
सोमवारी सकाळी कुटुंबीय मंदिरात गेल्यानंतर संतोष मंचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना कळविले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरी, वैयक्तिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला याचा तपास पोलीस करत आहेत. जळगाव येथील ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके कार्यरत केली असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. मंदिराच्या पूजाऱ्याच्या हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



