नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटींचा निधी; पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य या योजनेच्या माध्यमातून नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय नगरविकास खात्याने जाहीर केला आहे.

 

यातील चार कोटी रूपयांमधून नगरपरिषदेची अद्ययावत प्रशासकीय इमारात उभारण्यात येणार असून एक कोटी रूपयांचा निधी स्मशानभूमिसाठी प्रदान करण्यात आला आहे. या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी आधी दिलेल्या आश्‍वासनानुसार निवडणुकीच्या आधीच नशिराबादकरांना विकासकामांसाठी निधीची भेट दिली आहे. या माध्यमातून नशिराबादचा कायापालट होण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

 

याबाबत वृत्त असे की, नशिराबाद येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद स्थापन करण्यात आली असून जिल्हातील अन्य नगरपालिकांच्या सोबत येथे निवडणूक होणार आहे. दरम्यान, नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने नशिराबाद येथे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, रस्ते आणि गटारींसाठी निधी प्रदान करण्यात येत  असून गेल्या आठवड्यातच नशिराबाद ते सुनसगाव या रस्त्याचे विस्तारीकरण आणि डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आलेला आहे.

 

या पार्श्‍वभूमिवर, आज नशिराबाद नगरपंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आलेला आहे. नगरविकास खात्यातर्फे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य या योजनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा जीआर अर्थात शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या पाच कोटी रूपयांपैकी चार कोटी रूपयांमध्ये नगरपंचायतीसाठी अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून एक कोटी रूपयात नशिराबादकरांसाठी स्मशानभूमि उभारण्यात येणार आहे.

 

या संदर्भात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, नशिराबादचा कायापालट करण्याचे जाहीर अभिवचन आपण येथील नागरिकांना दिले असून या अनुषंगाने शहरातील विकासकामांचा प्रचंड गती प्रदान करण्यात आली आहे. लवकरच निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेसाठी अद्ययावत इमारत असावी असा विचार आपण आधीच मांडला असून याची पूर्तता झाली आहे. तर नशिराबादकरांनी सर्व सुविधांनी युक्त असणार्‍या स्मशानभूमिची मागणी देखील कधीपासूनच करण्यात येत होती. हे काम देखील आता मार्गी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 

दरम्यान सदर निधी मंजूरी झाल्याचे वृत्त नशिराबाद येथे वाऱ्यासारखी पसरले असता शिवसेना, युवा सेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फटाके फोडून आनंद व जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर,चंदुदादा भोळे विकास पाटील,यूवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, आप्पा धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर , बंडुरत्न पारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी, मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळि,  सोहन पाटील, सतिश रोटे,  भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content