Home धर्म-समाज नवरात्रोत्सवात महिलाशक्तीचा अनोखा सन्मान! महावितरणतर्फे खामगावात ‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रम उत्साहात

नवरात्रोत्सवात महिलाशक्तीचा अनोखा सन्मान! महावितरणतर्फे खामगावात ‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रम उत्साहात

0
12

खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाच्या पवित्र पार्श्वभूमीवर खामगाव महावितरण विभागीय कार्यालयात महिला अभियंते व महिला कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ‘सन्मान सौदामिनीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयीन आणि तांत्रिक कामांमधील विविध जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे, अचूकतेने व जिद्दीने पार पाडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. या शानदार सोहळ्यामुळे महावितरणमधील महिला वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि महिलांचा सन्मान अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे, खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सखाराम थानवी, खामगाव शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता समीर देशपांडे तसेच मानव संसाधन विभागाचे उपव्यवस्थापक श्रीकृष्ण खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पार पडला. वीज क्षेत्रासारख्या खडतर क्षेत्रात काम करताना वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे, अचूक कार्यालयीन कामकाज आणि सर्वसामान्य जनतेेशी प्रभावी संवाद साधणे या सर्वच आघाड्यांवर महावितरणच्या महिला कर्मचारी अत्यंत आघाडीवर असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात आवर्जून नमूद केले.
या विशेष कार्यक्रमाला खामगाव महावितरणमधील अधिकारी,अभियंते व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला अभियंत्या व कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन कामावरील अनुभव आणि मनोगत मनमोकळेपणाने व्यक्त केले. घरची कुटुंब व्यवस्था सांभाळत असतानाच दुसरीकडे खडतर कार्यालयीन जबाबदाऱ्यांचे उत्तम संतुलन साधत कर्तव्य बजावणाऱ्या महिलांच्या धाडसाचे व कौशल्याचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला असून संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
खामगाव महावितरण कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या महिला अभियंते व कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंत्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, ज्यातून कुटुंब आणि नोकरीचे उत्तम समतोल साधणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

Protected Content

Play sound