Home Cities अमळनेर अमळनेरात देशातील सातव्या आणि खान्देशातील पहिल्या श्री त्रिविक्रम मठाचा भव्य सोहळा

अमळनेरात देशातील सातव्या आणि खान्देशातील पहिल्या श्री त्रिविक्रम मठाचा भव्य सोहळा

0
20

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील मुंदडा नगर परिसरात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य ‘श्री त्रिविक्रम मठाचा’ शुभारंभ गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. देशातील सातवा आणि खान्देशातील पहिलाच श्री त्रिविक्रम मठ अमळनेर नगरीत सुरू झाल्यामुळे परिसरातील हजारो श्रद्धावानांमध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी जीवनाला योग्य आध्यात्मिक आधार मिळावा, धोरणात्मक व भक्तिमय वातावरणात मनःशांती अनुभवता यावी तसेच ध्यानधारणा व नामस्मरणासाठी हक्काची पवित्र जागा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने या मठाची स्थापना करण्यात आली आहे. ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विविध धार्मिक विधी व मंत्रोच्चारात पूजन सोहळा संपन्न झाला. यानंतर उपस्थितांच्या उपस्थितीत आकर्षक आतषबाजी करण्यात आली आणि हा मठ भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांसह संपूर्ण खान्देशातून आलेल्या असंख्य श्रद्धावानांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री त्रिविक्रम मठाचे दर्शन घेतले.
या सोहळ्याला खासदार स्मिताताई वाघ, जयश्रीताई पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, अभियंता सौरभ बागड, प्रांताधिकारी मयुर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नगरसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, विनोद भैय्या पाटील, बिपीन पाटील, तसेच पत्रकार, व्यापारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतीलमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना परिवार, अमळनेर यांच्या वतीने या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे अतिशय सुबक आणि नेमके नियोजन करण्यात आले होते.
कलियुगात ईश्वरी नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व असून भक्ती हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मुख्य आधार, पाया आणि कणा मानला गेला आहे. मानवी शरीर आजारी पडल्यास डॉक्टर त्यावर औषधोपचार करतात; परंतु मन अस्वस्थ झाल्यास त्याचे गंभीर दुष्टपरिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात आणि समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यास त्याचा थेट प्रभाव देशावर पडतो. मनातील विविध विकारांवर यशस्वी मात करून मानसिक व आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सद्गुरूंचे योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरते, अशी शिकवण या उपासना परिवाराच्या माध्यमातून दिली जाते. याच प्रमुख उद्देशापोटी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांनी गावोगावी सामूहिक उपासना केंद्रे सुरू करण्यासोबतच वैयक्तिक नामस्मरणासाठी श्री त्रिविक्रम मठांची निर्मिती हाती घेतली आहे.
अमळनेर येथे सुरू झालेल्या या नवीन मठात सर्व श्रद्धावानांना अत्यंत शांत व पवित्र वातावरणात नामस्मरण, मनोमन पठण तसेच विविध धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करून आपली आध्यात्मिक उन्नती साधता येणार आहे. ललिता पंचमीच्या पवित्र पर्वावर झालेल्या या मठाच्या शुभारंभामुळे अमळनेरच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एका महत्त्वपूर्ण व दिव्य केंद्राची भर पडली आहे.

Protected Content

Play sound