‘लाईव्ह’ नंतर गोळीबार : शिवसेना-उबाठा पदाधिकार्‍याचा मृत्यू !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फेसबुक लाईव्ह करून शिवसेना-उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईतल्या दहिसर परिसरात आज भयंकर घटना घडली असून यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळ हादरले आहे. दहिसरमध्ये मॉरीस नरोन्हा या कथित समाजसेवकाने आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना बोलावण्यात आले होते. नरोन्हा याने घोसाळकर यांच्या सोबत फेसबुक लाईव्ह केले. दरम्यान लाईव्ह सुरू असतांनाच मॉरीस हा उठून गेला. यानंतर घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह वरून बोलत असतांनाच मॉरीस याने घोसाळकर यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मॉरीस नरोन्हा यांनी स्वत:वर देखील गोळ्या झाडून घेतल्या. यात त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना-उबाठा पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र असून त्यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.

Protected Content